विरहाचा अंत

खूप सारे प्रश्न पडले,
पण सारे अनुत्तरात सडले,
उत्तरे ना तुला ना मला होती ठाऊक,
केवळ मनेच आपली होती भाऊक.

कुणाला खटकली आपली जोडी ?
ना कळली नात्यातील गोडी,
कुणी भरले घरच्यांचे कान ?
उठवले संघर्षाचे रान.

घरचे ही कसे भडकवण्यावर भुलले ?
कसे आपले प्रेम नाही कळले ?
दैवी प्रेमाचा तर गातात गुण गाण,
का नाही राखला आपल्या प्रेमाचा मान ?

माझ्यातील वाईटच सारे दिसले,
चांगुलपण कुठे फसले ?
ओळखतेस, मी होतो बरा,
कोण असतो जगात कोरा ?

तू ही का मान्य केलास दुरावा ?
तुलाही हवा होता का चांगुलपणाचा पुरावा ?
कसे दूराऊन जगणे जमले ?
की मन विरहात रमले ?

मोठा प्रश्न; भेटशील पुन्हा कधी ?
आपल्या प्रेमाला मान्य करेल दैवाची यादी ?
कधी होईल दैवाला दुरावल्याची खंत?
कधी होईल या विरहाचा अंत ?