निवड

तुझे चाहते स्मार्ट बरेच,
पण तुझ्या पसंतीला फेल ठरले सारेच,
कोळश्याच्या खाणीत भेटत असेल ही हिरा,
पण सांग मी कोळसा कसा वाटलो तुला बरा ?

मराठा राज्याचा मी मावळा,
मग तर असणारच रंग सावळा,
पण मजबूत नव्हती शरीरयष्टी,
मारामारीच्यातर मैलो दूर गोष्टी.

पैसा नव्हता हाती,
त्या अभावी दुरावलेली सारी नाती,
भले स्वप्ने होती मोठी,
पण कित्येक ठरतात खोटी.

शिक्षणात नव्हती हुशारी,
अभ्यास वाटे औषध विषारी,
पडत तडफडत पुढच्या वर्गाची गाठ,
घरचे तर प्रेमाने म्हणायचे माठ.

एवढ्या सद्गुणांची मी होतो खाण,
पण त्याकडे तू दिले नाहीस ध्यान,
भरभरून मला प्रेम दिलेस,
आणि या निर्धण्याला कुबेर केलेस.

पण शेवटी तक्रारीला दिलीस जागा,
मित्र म्हणतात तू दिलास दगा,
त्यांना समजावण्याचा प्रयत्न खूप करतो,
पण सोडून का गेलीस या प्रश्नाने सतत झुरतो.

तुझ्या अभावी आज पुन्हा झालोय खाली,
पण तुझ्या प्रेमाने बनलो भाग्यशाली,
नेहमी जाणवेल तुझ्या सोबतीची कमी,
पण तुझी आठवण जगण्यास येईल कामी.