सभा

तिथेच आहे उभा,
जिथे भरायची आपली सभा,
सभेचे दोघेच होतो सदस्य,
पण दोघे हि होतो अध्यक्ष.

सभेची वेळ नसायची ठरलेली,
ती एकांत अंदाजावर असायची उरलेली,
पण भरल्यावर वेळेचा कुठे असायचा भान,
सारे काही चर्चेलाच मान.

चर्चेचे विषय नसायचे खास,
तरी चालायची तासन्तास,
चर्चेतून होत नव्हते काही निष्पन्न,
पण भरपूर प्रेमाचे होत होते उत्पन्न.

चर्चेत अखेर ठराव व्हायचा संमत,
ज्यात पुढील भेटीची असायची गम्मत,
काहीतरी व्यवस्था असायची खायची,
अशा प्रकारे सभेची सांगता व्हायची.

पण शेवटची सभा होती वेगळी,
जिच्यात वरील सुखे नव्हती भोगली,
थोडा वेळ डोळ्यात पाणी,
सार्‍याची चाललेली अनाकानी.

तिथपासून सभा नाही भरल्या,
तिथे केवळ आठवणी उरल्या,
खूप वाटते एकदा शेवटची भरावी सभा,
आणि स्पष्ट व्हावा विरहामागचा गाभा.