तुझ्यासाठीच

तुझ्यासाठीच चालू हे भटकणे,
तुझे चालू नाही ना मला झटकणे,
माफ कर हा विचार गेला चाटून,
कारण एवढे समजावणे तुला नाही आले पटून.

तुझ्यासोबत स्वर्ग सातत्याने पहिले,
पण तू गेल्यावर नर्क सोबत राहिले,
या नर्कयातनेचा कसा करणार स्वीकार,
म्हणूनच तुझ्या शोध मोहिमेने घेतला आकार.

बातमी समजली तिकडे धावलो,
अनोळख्या दिशा अन जागांना पावलो,
बातमीची सत्यता ना पाहिली तपासून,
अपयशा नंतर हि तेच तंत्र ठेवले जोपासून.

वाटले माझा आवाज तरी तुझवर पोहोचेल,
त्याला तरी साद देणे तुला नक्की सुचेल,
म्हणून शोधताना मारत राहिलो हाका,
पण त्यांना हि ना सापडला तुझा नाका.

चालूच ठेवले भटकणे नि हाका मारणे,
सोबत चालूच तुझ्या सादीची प्रतीक्षा करणे,
या सार्‍याला वर्षे लोटली आज,
कळेना एवढ्या सहनशीलतेचे राज.

पण तुला हि माहिती आहे का भेटली ?
असेल तर ती आहे का पटली,
एकदा सांगाया ये जे असेल नसेल,
मन स्वतःशी कायमचे हसेल किंवा रुसेल.